राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्याचे मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात वाटप सुरू


मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार माहे एप्रिल 2021 व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण सुरू आहे.

तसेच कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना माहे मे 2021 व जून 2021 करीता अनुज्ञेय असलेले नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. त्यानुसार माहे मे 2021 करीताचे मोफत अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2021 महिन्यात मोफत धान्य घेतले नाही. त्यांना माहे मे 2021 मध्ये दुप्पट धान्य मोफत मिळणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरिता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. तसेच अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.

सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करुन घ्यावे, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी केले आहे.