या लबाडाने विकले होते राष्ट्रपती भवन, ताजमहाल आणि लाल किल्ला

शिक्षणाने वकील पण लांडीलबाडीतच करियर करणारा एक भामटा चोर नटवरलाल या नावाने जगात प्रसिद्ध होता याची अनेकांना माहिती असेल. ५० हून अधिक नावे घेतलेला हा भामटा असंख्य वेळा पोलिसानी पकडले तरी त्याच्या हातावर तुरी देऊन फरारी होण्यात माहीर होता. त्याने असंख्य अफरातफरी केल्या, अनेकांना गंडे घातले, अनेकांना चुना लावला. चोरी आणि ठगबाजीचे प्रतिक म्हणून शेवटी त्याने धारण केलेले नटवरलाल हे नाव प्रचलित झाले होते. १९१२ मध्ये बिहार मध्ये या भामटयाचा जन्म झाला होता आणि त्याचे खरे नाव होते मिथिलेश कुमार श्रीवास्तव.

त्याने वकिलीचे शिक्षण घेतले होते पण वकिली त्याला कधीच आवडली नाही. त्याने चोरीची सुरवात १ हजार रुपयापासून केली होती. शेजारी माणसाची बनावट सही करून त्याच्या बँकेतून त्याने १ हजार रुपये लंपास केले होते. फसवाफसवी मध्ये तो फारच निष्णात होता आणि आपल्या गोड बोलण्याने लोकांचा विश्वास मिळविण्यात माहीर होता. गोड बोलून अनेक व्यापाऱ्यांना त्याने चुना लावला होता.

त्याने परदेशी पर्यटकांना त्याच्या गोड बोलण्याची भुरळ घालून चक्क ताजमहाल आणि लाल किल्ला विकला होता असेही सांगितले जाते. राष्ट्रपतींची बनावट सही करून त्याने राष्ट्रपती भवन सुद्धा विकले होते असे म्हणतात. पोलिसांनी त्याला अनेकदा पकडले तर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार होत असे.

नटवरलालच्या नावावर ८ राज्यात १०० हून अधिक केसेस दाखल होत्या. ७० ते ९० च्या दशकात त्याचे नाव भारतात खुपच प्रसिध्द झाले होते. असल्या चोऱ्या आणि फसवाफसवी बद्दल त्याला चक्क १११ वर्षांची शिक्षा ठोठावली गेली होती. पण तो फरारीच होता. २००४ मध्ये त्याचे नाव शेवटचे ऐकायला आले. त्याच्या वकिलाने नटवरलालचे मृत्युपत्र त्याच्याकडे असल्याचे सांगितले होते. त्याचा मृत्यू कधी आणि कसा झाला हे आजही गुढ आहे. काही लोकांच्या मते तो २००९ मध्ये मरण पावला तर परिवाराच्या म्हणण्यानुसार तो १९९६ मध्येच मरण पावला होता.