शेर्पा कामी रिताची एव्हरेस्टवर विक्रमी २५ व्यांदा चढाई

नेपाळी गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी शुक्रवारी एव्हरेस्टवर २५ व्या वेळी यशस्वी चढाई करून स्वतःचेच चोवीस वेळा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचे रेकॉर्ड तोडले आहे. ५१ वर्षीय कामी यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट सात दिवसात दोन वेळा चढण्याची कामगिरी सुद्धा केली आहे. चोवीस वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम नोंदविताना कामी यांनी सात दिवसात दोन वेळा एव्हरेस्ट चढाई केली होती. दोन वर्षापूर्वी त्यांनी हा विक्रम केला होता.

काठमांडू स्थित सेवन समित ट्रॅक कडून मिळालेल्या माहितीनुसार माउंट एव्हरेस्ट चढाई साठी रस्ता तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व कामी करत होते. शुक्रवारी त्यांनी ८८४८.८६ मीटर उंचीच्या शिखरावर १२ शेर्पाच्या टीम सह समिट केले. कामी यांनी १९९४ मध्ये प्रथम एव्हरेस्ट सर् केले होते. कामी यांच्या नंतर २३ वेळा एव्हरेस्ट चढाई करण्याचा विक्रम अप्पा शेर्पा आणि फुर्बा तासी शेर्पा यांच्या नावावर आहे.