मोदींविरोधात ट्विट करून टीकेचे धनी झाले  हेमंत सोरेन

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोदींवर ट्विटर वरून केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे. आंध्रप्रदेश मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सोरेन यांच्यावर टीका करताना त्यांना मोलाचा सल्ला ही दिला आहे. रेड्डी म्हणतात, ‘तुम्ही जे बोलता आहात ते चुकीचे आहे. देशाच्या या अवघड काळात पंतप्रधानाच्या सोबत राहून बरोबरीने काम करायला हवे.’ रेड्डी यांच्या बरोबरच अरुणाचल, नागालँड, मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सोरेन यांच्यावर टीका केली आहे.

हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना फोन करून चर्चा केल्याचे ट्विटरवर लिहिताना ‘पंतप्रधानांनी मन की बात ऐवजी कामाचे काही सांगितले असते तर बरे झाले असते’ असे म्हटले होते. या टीकेमुळे सोरेन सोशल मीडियावर ट्रोल झाले.

रेड्डी यांनी सोरेन यांना त्यांची चूक दाखवून देताना शुक्रवारी ट्विट केले. त्यात ते लिहितात,’ प्रिय हेमंत सोरेन, माझ्या मनात तुमच्या बद्द्दल आदर आहे. भाऊ म्हणून एक विनंती करतो. कितीही मतभेद असले तरी या पातळीवर उतरून राजकारण केले तर देश कमजोर होणार आहे. करोना विरुद्ध लढाईची ही वेळ आहे. ही वेळ कुणाकडे बोट दाखवायची नाही. पंतप्रधानाच्या सोबत राहून त्यांचे हात बळकट करायला हवेत.’

झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनीही पंतप्रधानांनी तुम्हाला फोन करून मोठेपणा दाखविला पण तुम्ही मात्र मुख्यमंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली असे सोरेन यांना सुनावले आहे. कॉंग्रेसने मात्र मुंडा यांचे समर्थन केले आहे.