काम गवे मारणे, जागा १२, अर्ज ४५ हजार

नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली की एका जागेसाठी सुद्धा शेकड्याने अर्ज येतात यात नवल नाही. पण नोकरी कुठल्या पदासाठी आहे आणि त्यासाठी किती अर्ज येतील याचेही एक गणित असते. अमेरिकेतील ग्रांड कॅनन नॅशनल पार्क मध्ये अशीच एक नोकरीची जाहिरात आली मात्र त्याला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला. या पार्क मध्ये गव्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्यामुळे गवे मारण्यासाठी १२ जागा भरल्या जाणार आहेत. या १२ जागांसाठी तब्बल ४५०४० अर्ज आले आहेत असे समजते.

या जागेसाठी कुशल व्हॉलिंटीअर्स भरायचे आहेत. वास्तविक राष्ट्रीय पार्क मध्ये शिकारीला कायद्याने बंदी आहे. पण इथे गवे मोठ्या प्रमाणावर मारायचे असल्याने हा कार्यक्रम शिकार या सदरात धरला गेलेला नाही. उलट गव्यांची संख्या कमी करण्याचा मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

बीबीसीच्या रिपोर्ट नुसार युएस नॅशनल पार्क सर्व्हिसने १२ स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागविले होते. पण त्यासाठी ४५०४० अर्ज आल्याने आता त्यातील २५ शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत आणि त्यातून १२ जणांची निवड होणार आहे. उमेदवाराचे कौशल्य तपासले जाणार आहे. गेल्या काही वर्षात येथे गव्यांची संख्या प्रचंड वाढून ती ६०० वर गेली आहे. पार्कला २०० गवे जिवंत ठेवायचे आहेत. मृदसंधारण व्हावे आणि पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी गव्यांची संख्या कमी केली जाणार असल्याचे समजते. पर्यावरण वाद्यांनी मात्र या बाबतीत धोक्याचा इशारा दिला आहे.