
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. सध्या दिल्लीतील परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. दिल्ली सरकारला केंद्राकडून नुकताच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. आम्हाला रोज एवढाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी दिल्ली सरकारने केली असताना केंद्राने मात्र असमर्थता दर्शवली आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले असताना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोदी सरकारला फटकारले; कठोर निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडू नका
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा दिल्लीला झाला पाहिजे. दिल्लीच्या रुग्णालयांना प्रत्येक दिवशी, ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिला जावा. हा पुरवठा पुढील आदेशापर्यंत असाच केला जावा. दरम्यान यावेळी न्यायालयाने सरकारविरोधात आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करु नका, अशा शब्दांत फटकारले.
सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. यांनी न्यायालयाला माहिती देताना दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, मध्यरात्रीपर्यंत ५२७ मेट्रिक टन आणि सकाळी ९ वाजेपर्यंत ८९ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
