सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीदरम्यान केंद्राने स्पष्ट केली भूमिका; कोरोनामुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव


नवी दिल्ली – गुरुवारी सर्वोच्च न्यायालयासमोर कोरोनामुळे देशातील नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाची कल्पना आम्हाला असल्याचे केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने म्हटले आहे. आम्हाला देशातील जनतेने दोनदा निवडणून दिले आहे. लोकांना होत असणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव असून त्यांची काळजी आम्हालाही वाटते. त्यामुळेच ऑक्सिजनचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात करण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे मोदी सरकारने न्यायालयाला सांगितले. ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केले जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. याचसंदर्भातील सुनावणीदरम्यान केंद्राने आपली बाजू मांडली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. डी.व्हाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सरकारची बाजू मांडली. केवळ दिल्लाचा विचार केंद्र सरकार करत नसून संपूर्ण देशाचा विचार करत असल्याचं मेहता यांनी सांगितले. दोनवेळा आम्हाला देशातील जतनेते निवडून दिले आहे. आम्हाला जनतेची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची चिंता आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी आम्ही राजकीय स्तरावरही प्रयत्न करत असून मित्र देशांकडून ऑक्सिजनची आयातही केली जात असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही दिल्ली सरकारकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देऊ इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्ली सरकारने हा विषय वाद घालण्याचा नसल्याचे सांगूनही हा वाद केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार असा करुन ठेवल्याचा आरोपही मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना केला. देशभरातील सर्वच ठिकाणांहून होणाऱ्या मागणीचा विचार आम्हाला करावा लागतो, असेही सरकारच्यावतीने मेहता यांनी सांगितले. सध्या सरकारचा ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भातील सुत्र हे कायमस्वरुपी ठरलेले नसून त्यात गरजेनुसार बदल करण्यात येतो. अनेक तज्ज्ञांची मदत घेऊन आकडेवारीच्या आधारे ऑक्सिजनचा पुरवठा कसा केला जावा, याचे नियोजन केंद्र सरकारने केल्याचेही मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.

फक्त दिल्लीतील लोकांची चिंता आम्हाला नसून देशातील सर्व जनतेची काळजी आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिनचा पुरवठा आणि मागणी याचे ऑडिट व्हावे अशी मागणी कधीही करण्यात आलेली नाही. पण तसे दावे दिल्ली सरकारकडून केले जात आहे. संपूर्ण देशातील ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा याचे ऑडिट करण्याची मी मागणी केली. तसे केल्यास अधिक चांगल्याप्रकारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा उभारता येईल. ते केवळ दिल्लीमध्ये रुग्णांचा मृत्यू होत आहे, एवढच सांगताना दिसतात. आम्हालाही दिल्लीतील लोकांची चिंता असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारने, महाराष्ट्राला पुरवण्यात आलेला ऑक्सिजन आणि मुंबईला पुरवण्यात आलेल्या ऑक्सिजनची तुलना ज्या पद्धतीने केली आहे, तशी तुलना होऊ शकत नसल्याचेही मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

कोरोनाच्या संकटकाळामध्ये वेगवेगळ्या आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात जे सुत्र केंद्र सरकारने तयार केले आहे, त्यानुसार सर्व ठिकाणी योग्य आणि पुरेश्याप्रमाणात आरोग्य सामग्री पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मेहतांनी न्यायालयाला सांगितले.