पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही झपाट्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी देशातील राज्यांची आणि जिल्ह्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ज्या राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानांनी तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.

पंतप्रधानांना देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना त्या राज्यांबाबात माहिती देण्यात आली, जिथे 1 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तसेच पंतप्रधानांना कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या जिल्ह्यांबाबतही सांगण्यात आले. राज्यांद्वारे आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीसंदर्भातही माहिती पंतप्रधानांना दिली गेली.

पंतप्रधानांनी आढावा घेतल्यानंतर आरोग्य सेवां आणखी मजबूत करण्यासाठी काम करण्यात यावे, असे निर्देश दिले. त्याचबरोबर जलद आणि सर्वांगीण प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही चर्चा करण्यात आली. केंद्राने राज्यांना कोरोनामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची ओळख पटवण्यासाठी एक अॅडवायझरी पाठवण्यात आली होती.

जिथे कोरोना रुग्णांची संख्या 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून अधिक भरलेले आहेत. त्या जिल्ह्यांची वेगळी वर्गवारी करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा पंतप्रधानांनी घेतला. त्यांनी रेमडेसिवीरसह इतर औषधांच्या उत्पादनात वाढ करण्याबाबत सुरु असेलल्या प्रयत्नांबाबतची माहिती देखील देण्यात आली. पुढील काही महिन्यांमध्ये लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी लसीकरण आणि रोडमॅपच्या प्रगती यासंदर्भात पंतप्रधानांनी आढावा घेतला.

यासंदर्भात पंतप्रधानांना सांगण्यात आले की, राज्यांना जवळपास 17.7 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी लसीच्या अपव्ययांबाबतचा राज्यवार आढावा घेतला. तसेच पंतप्रधानांनी सांगितलं की, 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येच्या जवळपास 31 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी लसीकरणासाठी काही सूचनाही केल्या. या बैठकीमध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारमण, डॉ. हर्षवर्धन, पीयूष गोयल आणि मनसुख मांडविया यांच्यासह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.