गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा


पणजी – कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढताना दिसत आहे. दररोज लाखांच्या नवीन कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत आहे. याचप्रमाणे गोव्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात आज(शुक्रवार) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे.

कर्फ्यू कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत घरगुती सामानांची दुकाने सुरू राहतील. तसेच, सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत रेस्टॉरंट टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील. या संदर्भात उद्या विस्तृत आदेश काढला जाईल, असे देखील मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले की, राज्यात पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही. उद्या (शनिवार) सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात आदेश जारी केले जातील.

देशात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. अशात महाराष्ट्रात वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता राज्य सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेक मराठी मालिकांचे तसेच रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आले.

दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 10 मे पर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.