शनिवारपासून बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन


मुरबाड – कोरोनाबाधितांची बदलापूर शहरातील वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसेच सगळ्या विभागांचे अधिकारी, पोलीस यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लॉकडाऊन प्रभावीपणे लावला नाही, तर बदलापूरची कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ शकत नाही, असा निष्कर्ष सर्वांनीच काढला. त्यामुळे शनिवारपासून बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

बदलापूरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने या कालावधीमध्ये आठ दिवसांसाठी काटेकोरपणे बंद राहतील. दूध, फळे, भाजीपाला, किराणा या दुकानदारांना फक्त होम डिलिव्हरी देता येईल. अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कडक स्वरुपाची कारवाई केली जाईल. तर मेडिकल आणि दवाखाने मात्र सुरु राहतील.

आमदार किसन कथोरे यांनी यापूर्वी मुरबाड शहरामध्ये अशाच प्रकारचा कडक लॉकडाऊन लावला होता. हा लॉकडाऊन लावण्यापूर्वी मुरबाड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला जवळपास 150 च्या घरात होती. तर लॉकडाऊननंतर आठच दिवसात ती रुग्णसंख्या 20 वर आली होती. त्यामुळे बदलापूर शहरात सुद्धा अशा प्रकारचा लॉकडाऊन लावला, तर रुग्ण संख्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. सोबतच बदलापूरकरांनी सुद्धा 8 दिवस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.