छोटा राजनच्या मृत्युच्या वृत्तानंतर एम्सच्या डॉक्टरांचा खुलासा


नवी दिल्ली – काही प्रसारमाध्यमांनी कोरोनामुळे तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू झाल्याची बातमी दिली आहे. पण छोटा राजन हा जिवंत असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. राजनवर नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी काही प्रसारमाध्यमांनी उपचारादरम्यान राजनाचा मृत्यू झाल्याची बातमी दिली होती. पण एएनआयने काही वेळातच एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचे म्हटले आहे.

राजनला तिहारच्या तुरुंगामध्येच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे, असे आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण लक्षणे दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला.


तुरुंग प्रशासनाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले. पण राजनची प्रकृती उपचारादरम्यान खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. राजनवर एम्समध्ये २६ एप्रिलपासून उपचार सुरु आहेत. एप्रिलमध्ये तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळे ठेवले गेल्याचे तुरुंग प्रशासने स्पष्ट केले आहे.