१ जूनला केरळ मध्ये धडकणार मान्सून

करोनामुळे ग्रासलेल्या भारताला पावसासंदर्भात चांगली बातमी आहे. यंदा १ जून लाच केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होत असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यामुळे शेती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची संधी मिळणार आहे. भारतातील बरेच मोठे कृषी क्षेत्र मान्सून पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून चांगला असेल तर शेती उत्पन्न वाढते आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी गुरुवारी केरळ मध्ये १ जून रोजी मान्सून येईल असे जाहीर केले असून देशभर यंदा चांगला पाउस होण्याची शक्यता वर्तविली. अर्थात देशाच्या कोणत्या भागात किती आणि कसा पाउस पडेल याचे अनुमान १५ मे रोजी वर्तविले जाणार आहे. देशाच्या ७५ टक्के भागात दक्षिण पश्चिम मान्सून बरसतो. जून ते सप्टेंबर या काळात देशाच्या या भागात चांगला पाउस होणार आहे. पावसाची सरासरी १०३ टक्के असेल असेही सांगितले गेले आहे.

देशाच्या उत्तर भागात, मैदानी आणि पूर्वोत्तर भागात कमी पाउस होईल असा अंदाज आहे. प्रशांत महासागरात गतवर्षी प्रमाणेच अल नीनाचा प्रभाव असून पूर्ण मान्सून सिझन मध्ये अल निनो प्रभावी होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले गेले आहे.