भरपूर हिंडा, सरकार देणार ७५ टक्के खर्च

करोना मुळे जगभरातील नागरिकांवर आलेली प्रवास बंधने अजून फारशी शिथिल झालेली नाहीत. करोनाच्या नव्या लाटेमुळे ही बंधने आणखी काही काळ शिथिल होण्याचे शक्यता कमी दिसत असली तरी अनेक देश हळू हळू करोना प्रभावातून बाहेर पडू लागले आहेत. फ्रांस मध्ये जवळ जवळ एक वर्ष लॉकडाऊन होता आणि आता या देशाची वाटचाल अनलॉक कडे सुरु झाली आहे. अश्यावेळी वर्षभर घरात अडकून पडावे लागल्याने तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत होता. यामुळे फ्रांस सरकारने युवकांच्या प्रवासावरील बंधने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहेच पण प्रवासाचा ७५ टक्के खर्च करण्याची तयारी दाखविली आहे.

हॉलिडे व्हाउचर या नावाने हा उपक्रम सुरु केला जात आहे. त्यात जगभरातील १० हजाराहून अधिक पर्यटनस्थळी विद्यार्थी, तरुणाईला जाता येणार आहे. त्यासाठी रिझर्वेशन, आणि खर्चाचा तपशील प्रथम सरकारला सादर करायचा आहे. तो योग्य वाटल्यास सरकार त्यातील ७५ टक्के रक्कम देणार आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी या योजनेचा फायदा अधिकाधिक घ्यावा यासाठी शाळा, कॉलेज मध्ये या योजनेची माहिती दिली जात आहे. सरकार कमाल २०० युरो पर्यंत रक्कम देणार आहे. २० लाख लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारने तयारी केली असल्याचेही सांगितले जात आहे.