चंकी पांडेला मयतीत रडण्यासाठी आली होती ५ लाखाची ऑफर

बॉलीवूड कलाकारांना अनेक कार्यक्रमांसाठी बोलावणी येत असतात आणि हे कलाकार चांगली भारीभक्कम रक्कम घेऊन अश्या कार्यक्रमाना उपस्थिती लावतात. भले मग तो एखादा उद्घाटन कार्यक्रम असतो, कधी लग्न समारंभ असतात. पण आत्तापर्यंत एखाद्या मयतीत रडण्यासाठी कुणा कलाकाराला अशीच मोठी रक्कम मोजून बोलावले जात असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता चंकी पांडे याला मात्र असा अनुभव आला होता.

एका मुलाखतीत हा किस्सा सांगताना चंकी म्हणतो, २००९ मध्ये मुलुंड मधील एका उद्योजक कुटुंबातील एकाचे निधन झाले होते. त्याच्या मयतीत मी रडावे आणि अति दुःखाचे नाटक करत अंत्यसंस्कार होईपर्यंत एका कोपऱ्यात गुपचूप उभे राहावे यासाठी ५ लाख रुपये देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. या कुटुंबाला त्यांचे बॉलीवूडशी संबंध आहेत आणि तेथे त्यांची गुंतवणूक आहे असे भासवायचे होते पण मी साफ नकार दिला. शेवटी त्यांची हालत पाहून मी रिप्लेसमेंटला पाठविण्याची तयारी दाखविली. अर्थात माझ्या जागी मी कुणाला पाठविले ते मी सांगणार नाही. पण पुतळ्यासारखे नुसते उभे राहण्यासाठी ५ लाख ही ऑफर चांगलीच होती.

चंकी ९० च्या दशकात लोकप्रिय कलाकार म्हणून नावाजला गेला होता. तेजाब, खतरे के खिलाडी हे त्याचे चित्रपट गाजले होते मात्र आजकाल तो सिनेसृष्टीतून गायब झाला आहे.