रशियाच्या सिंगल डोस स्पुतनिक लाईट लसीची एन्ट्री

रशियाने पुन्हा एकदा कोविड १९ विरोध लस तयार करण्यात ते जगाच्या अजिबात मागे नाहीत हे सिध्द करून दाखविले आहे. रशियाने स्पुतनिक फाईव्ह करोना लस ६० हून अधिक देशांना पुरविली आहे आणि ही लस खुपच प्रभावी ठरल्याचेही दिसून आले आहे. मात्र या लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. आता रशियाने त्या पुढे जाऊन सिंगल डोस करोना लसीला मंजुरी दिली असून तिचे नाव स्पुतनिक लाईट असे आहे.

रशियाच्या आरडीआयएफ तर्फे या लसीसाठी आर्थिक सहाय्य केले गेले असून गुरुवारी त्यासंदर्भात एक पत्रक जारी केले गेले आहे. त्यात स्पुतनिक फाईव्ह ९१.६ टक्के प्रभावी आहे त्या तुलनेत स्पुतनिक लाईट ७९.८ टक्के प्रभावी ठरल्याचे म्हटले गेले आहे. अर्थात लाईट व्हर्जन मुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे करोनावर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे असा दावा केला जात आहे. या लसीची किंमत सुद्धा १० डॉलर्स म्हणजे ७३० रुपयांपेक्षा कमी आहे.

आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीव या संदर्भात माहिती देताना म्हणाले, या लसीमुळे करोना झाल्यावरही रुग्ण गंभीर होण्याची शक्यता खुपच कमी होणार आहे. ही लस करोनाच्या सर्व व्हेरीयंटवर प्रभावी असून मास्को गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटनेच ती तयार केली आहे. स्पुतनिक फाईव्ह ला ६० देशांनी मंजुरी दिली असून त्यात भारताचा समावेश आहे. गेल्या शनिवारी हैद्राबाद येथे स्पुतनिक फाईव्हचे दीड लाख डोस विमानाने आले आहेत.