माही धोनीच्या घरी आला नवा पाहुणा

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीच्या घरी नवा पाहुणा दाखल झाला असून साक्षी धोनीने या नव्या पाहुण्याचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साक्षी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून आपले कुटुंब, परिवार, शेती या संदर्भातले फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करते. तिच्या नव्या व्हिडीओ मध्ये काळ्या रंगाचा एक उमदा घोडा पांढऱ्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. हाच काळा घोडा धोनीचा नवा पाहुणा असून त्याचे नाव आहे चेतक.

साक्षी चेतकच्या फोटो खाली कॅप्शन लिहिताना म्हणते,’ आमच्या परिवारात तुझे स्वागत आहे चेतक. तू जेव्हा प्रथम लिली (कुत्री) ला भेटलास तेव्हा खऱ्या जंटलमन प्रमाणे वागलास. आमच्या फॅमिली पॅक मध्ये तुझा आनंदाने स्वीकार आहे.’

बायोबबलचे संरक्षण असूनही आयपीएल मध्ये खेळाडूंना करोना लागण झाल्यामुळे ही स्पर्धा मंगळवारी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे चेन्नई टीमचा कप्तान माहीला परिवारासह काही काळ व्यतीत करण्याची संधी मिळाली असून तो लवकरच रांचीला घरी येत आहे असे समजते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी ऑर्गनिक शेती कडे वळला असून त्याचे ४६ एकराचे फार्म आहे. धोनीचे बाईक प्रेम जगजाहीर आहे. पण धोनीला प्राणी सुद्धा खूप आवडतात. त्याच्या फार्म हाउसवर कोंबड्या, कुत्री, गाई आहेत. धोनीच्या शेतात १०० गाई सांभाळल्या जात आहेत. धोनी विविध प्रकारच्या बाईक वरून राईड करतानाचे अनेक फोटो वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. आता कदाचित त्याच्या घोडदौडीचे फोटो लवकरच पाहायला मिळतील अशी आशा करण्यास हरकत नाही.