वर्ध्यात 8 ते 13 मे पर्यंत कडक निर्बंध लागू


वर्धा – कोरोनाचे देशभरात थैमान सुरुच आहे. त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही. पण राज्याला दिलासा एवढाच आहे की राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. पण असे असले तरीही हे जिल्हे वगळता इतर भागांमध्ये कोरोनाची दहशत कायम आहे. स्थानिक प्रशासनाकडून याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. या नियमांचे नागरिकांनाही पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता वर्ध्यात प्रशासनाकडून 8 मे पासून, 13 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या निर्बंधांची सुरुवात 8 मे ला सकाळी 7 वाजल्यापासून होणार असून, 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे निर्देश दिले आहेत. 1 एप्रिलपासून 5 मे पर्यंत वर्ध्यात तब्बल 20104 रुग्ण आढळून आले, तर 465 रुग्णांचा मृत्यू झाला.

या निर्बंधांअतर्गत जिल्ह्यात काय सुरु असेल आणि काय बंद?

 • अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी.
 • किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकान बंद राहणार, सकाळी 7 ते सकाळी 11 वाजतापर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही.
 • शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केवळ घरपोच पार्सल सुविधा राहणार.
 • बाजार समित्या, क्रीडांगण, उद्यान, शाळा, ट्युशन क्लासेस, लग्न, सोहळे, कार्यक्रम, मंगल कार्यालय, नागरी भागातील पेट्रोल पंप, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय बंद असणार.
 • बँक, पतसंस्था, पोस्ट ग्राहकांना बंद राहील, प्रशासकीय कामकाज सुरू राहील.
 • जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून मालवाहतूक, रुग्ण वाहतूक सुरू असणार.
 • दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजतापर्यंत सुरू असणार.
 • मेडिकल, वैद्यकीय दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार.
 • घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र आणि rtpcr टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक.
 • या काळात अत्यावश्यक सेवा, कोरोनाशी संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालय उघडे राहणार आहे तर इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहे.
 • निर्बंध सागू असताना या काळात खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.