काल दिवसभरात 3,29,113 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात


नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट काही केल्या कमी व्हायचे नावच घेत नाही आहे. देशभरात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच देशात पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशात दुसऱ्यांदा एका दिवसात चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 412,262 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 3980 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,29,113 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी देशात 30 एप्रिल रोजी 401,993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. जगभरातील दैनंदिन रुग्णवाढिपैकी जवळपास 40 टक्के रुग्ण केवळ भारतातील आहेत.

5 मेपर्यंत देशभरात 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 19 लाख 55 हजार 733 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 29 कोटी 67 लाखांहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 21 टक्क्यांहून अधिक आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण वाढून 17 टक्के झाला आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत जगभरात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येमध्येही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मॅक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी तब्बल 57 हजार 640 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 57 हजार 006 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 41,64,098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण 85.32% एवढा झाला आहे. दरम्यान काल 920 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,83,84,582 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 48,80,542 (17.19 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

काल मुंबईत एकूण 3879 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3686 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 98 हजार 545 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 51 हजार 472 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 123 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (28 एप्रिल-3 मे) 0.55 टक्क्यांवर गेला आहे.