डॉक्टरांचा सैतान असा उल्लेख करणाऱ्या कॉमेडियन सुनिल पाल विरोधात गुन्हा दाखल


मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन सुनिल पालविरुद्ध डॉक्टरांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात बाधितांची अहो-रात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनिल पाल याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांविषयी एक व्हिडीओ सुनिल पालने व्हायरल केला आहे, त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तसेच टीका करण्यात आली आहे.

सुनीलनी एका चॅनेलशी संवाद साधताना डॉक्टर सैतानाच्या वेशात फिरत असून, कोरोनाच्या नावाने डॉक्टर गरीबांना घाबरवत आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझ्मा नाही असे सांगून त्यांचे मानसिक शोषण करत आहेत. गरीब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल, याची पुरेपुर काळजी घेतली जात असल्याचे वक्तव्य त्याने व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

डॉक्टरांच्या संघटनेकडून या प्रकरणी दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीसठी सुनील पालला बोलावले जाऊ शकते. दरम्यान सुनील पालने आपल्या केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.