या शेतकऱ्याने अगदी सहज वाढविली आपल्या देशाची सीमा

बेल्जियम मधील एका शेतकऱ्याने नकळतच फ्रांसला लागून असलेली त्याच्या देशाची सीमा वाढवून घेतली आणि बघता बघता हा जगभर चर्चेचा विषय बनला. या शेतकऱ्याने एका झटक्यात फ्रांसची सीमा छोटी केली आणि बेल्जियमची सीमा वाढविली. पण सगळ्यात मजेची बाब अशी की यामुळे दोन्ही देशांच्या सीमांवर बाचाबाची, हाणामारी वगैरे घटना घडल्या नाहीत उलट दोन्ही देशातील संबंधित शहरांच्या महापौरांच्या मुखावर हास्य उमटले.

बीबीसीने या संदर्भात बातमी दिली आहे. त्यानुसार बेल्जियम आणि फ्रांस या दोन्ही देशांच्या सीमेची खूण म्हणून एक सात फुटी दगड रोवला गेला होता. एक शेतकरी त्याच्या ट्रॅक्टरच्या वाटेत हा दगड येत असल्याने बराच काळ नाराज होता. शेवटी त्याने हा दगड फ्रांसच्या सीमेत ढकलून दिला. सीमेवर असलेल्या लावॅक्स गावाचे महापौर डेव्हिड यांनी फ्रेंच टीव्ही टीएफएल ला मुलाखत देताना आमच्या एका शेतकऱ्याने फ्रांसला छोटे तर बेल्जियमला मोठे बनविल्याचे सांगितले. ते पुढे असेही म्हणाले अश्या कृत्यांमुळे शेजारी शेजारी असलेल्या जमीन मालकांच्या मध्ये वादावादी होते इथे तर शेजारी देश आहे.

त्यावर फ्रांस मधील सीमा गावाचे महापौर म्हणाले आम्ही थोडक्यात सीमा युद्धापासून बचावलो आहोत. फ्रांस आणि बेल्जियम यांची सीमा रेखा ६२० किमीची आहे. वॉटरलुच्या नेपोलियनच्या पराभवानंतर पाच वर्षांनी १८२० मध्ये ही सीमा निश्चिती केली होती. दरम्यान या शेतकऱ्याला सीमा दगड जागेवर ठेवण्याची तंबी दिली गेली असून ते झाले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असे समजते.