फिरोज कोटला मैदानात दोन सट्टेबाजांना पकडले

बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटने दिल्लीच्या फिरोज शा कोटला मैदानावर अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. हे दोघे खोटी ओळखपत्रे तयार करून मैदानात घुसले होते आणि व्हीआयपी लाउंज मधून फोनवरून प्रत्येक बॉलची माहिती बाहेर देत होते असे समजते.

या दोघांनी हाउसकीपिंग स्टाफसाठी दिले जाणारे ओळखपत्र बेकायदा मिळविले होते. २ मे रोजी हैद्राबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना सुरु असताना एसीयुच्या एका अधिकाऱ्याने एका व्यक्तीला फोन वर बोलत असताना पाहिले आणि फोन कुणाचा अशी विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीने मैत्रिणीचा फोन असल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्याला संशय आल्याने त्याने पुन्हा नंबर लावून दे असे सांगताच हा माणूस दोन फोन तेथेच टाकून पळून गेला. या प्रकारची माहिती त्वरित पोलिसना दिली गेली.

आयपीएल साठी स्टेडियमच्या आत प्रवेश करण्यासाठी खास ओळखपत्रे दिली गेली आहेत. या व्यक्तींनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र मिळविले होते. फोनवरून बाहेर सट्टेबाजाना प्रत्येक बॉलची माहिती देत होता असे चौकशीत स्पष्ट झाले. याला पीच सीडिंग असे म्हणतात. यात प्रत्येक बॉल वर सट्टा लावला जातो. बॉल पडल्यावर आणि टीव्हीवर दृश्य दिसेपर्यंत मधल्या वेळात मैदानात उपस्थित व्यक्ती काही क्षण अगोदर पुढच्या बॉलची माहिती बाहेर सट्टेबाजांना देते आणि त्यावर सट्टा खेळला जातो.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून कृष्ण गर्ग आणि मनिष कंसाल अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी सट्टेबाजांना माहिती देत असल्याची कबुली दिली आहे असेही समजते.