झेड प्लस सिक्युरिटी साठी अदार पूनावाला यांची मुंबई हायकोर्टात याचिका

कोविशिल्ड या करोना लसीचे उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविली जावी यासाठी मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे. पूनावाला सध्या ब्रिटन मध्ये आहेत आणि तेथून लवकर भारतात परतण्याची शक्यता नाही असे समजते.

सिरम इन्स्टिट्यूट व सरकार नियमन कार्य प्रमुख प्रकाशकुमार सिंह यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना पत्र लिहून अदार पूनावाला याना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्राने त्यांना सीआरपीएफ कमांडो असलेली वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली होती. पण त्यापूर्वीच पूनावाला ब्रिटनला गेले आहेत.

पूनावाला यांनी देशात करोना प्रसार आटोक्यात येत नसल्याने लसीचे उत्पादन वाढवावे यासाठी त्यांच्यावर फार दबाब येत असल्यांचे सांगताना बडे नेते आणि राजकीय प्रभावी व्यक्तींकडून वारंवार धमक्या येत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यात त्यांनी शिवसेना नेत्यांचा उल्लेख केला होता. मात्र लसीचे उत्पादन एकाएकी वाढविणे शक्य नसते आणि ते एका व्यक्तीचे काम नाही असे पूनावाला यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाय दर्जाच्या सुरक्षेपेक्षा झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळावी अशी त्यांची मागणी आहे.