न्यूझीलंड पंतप्रधान जेसिंडा वर्षअखेर करणार विवाह

न्यूझीलंडला करोना मुक्त करण्यात मोठे योगदान दिलेल्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन जगभरात कौतुकाच्या मानकरी ठरल्या आहेत. आता त्यांच्या संदर्भात आणखी एक गोड बातमी आहे. जेसिंडा या वर्षअखेर दीर्घ काळाचा मित्र क्लार्क गेफोर्ड यांच्या बरोबर विवाहबद्ध होत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एंगेजमेंट केली असून त्यांना एक मुलगी आहे.

जेसिंडा यांनी लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही मात्र द. गोलार्धातील उन्हाळ्यात लग्नाचा विचार असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंड मध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळा असतो. जेसिंडा यांनी २०१८ मध्ये मुलीला जन्म दिला असून तिचे नाव नेवे आहे. गेफोर्ड हेच नेवेला अधिक काळ सांभाळतात असे समजते. ते टीव्ही फिशिंग शो सादर करतात.

गेफोर्ड यांनी माहिया या किनारपट्टीवरील शहरात एका पहाडावर चढून जेसिंडा याना प्रपोज केले होते. पण एका अज्ञात माणसाला त्यात काहीतरी गडबड वाटल्याने त्याने पोलिसांना फोन केला होता. पोलीस श्वान पथकासह तेथे हजर झाले होते अशी आठवण जेसिंडा सांगतात. त्या म्हणतात, या गडबडीमुळे प्रपोज केल्याचा क्षण अधिक यादगार झाला.

पंतप्रधान पदावर असताना फार थोड्या लोकांनी विवाह केले आहेत. फिनलंडच्या पंतप्रधान सना यांनी गतवर्षी मार्क राईकनन याच्यासोबत विवाह केला आहे तर डेन्मार्कचे पंतप्रधान मॅट फ्रेडरिक्सन यांनी गतवर्षी प्रेमिक बो टनबर्ग बरोबर विवाह केला आहे.