मोदींनी आता कोरोनाविरोधी लढाईची कमान नितीन गडकरींवर सोपवावी – सुब्रमण्यम स्वामी


नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशासह अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांत ऑक्सिजनच्या आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी कोरोनाची लढाई लढताना पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नसल्यामुळे पंतप्रधान मोदींनी या लढाईची कमान आता नितीन गडकरीं यांच्याकडे सोपवावी अशी सूचना खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

कोरोनाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत अनेक वेळा मोदी सरकारला खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचना केल्या आहेत. त्यांनी आताही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारची एक सूचना केली आहे. ते म्हणतात की, इस्लामिक राज्यकर्त्यांच्या आक्रमणापासून आणि साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या कचाट्यातून भारताने आतापर्यंत आपली यशस्वी सुटका करुन घेतली आहे. त्याच पद्धतीने आताही कोरोनाच्या संकटावर मात केली जाईल.


आता देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल आणि ती लाट लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अबलंबून राहण्याला काही अर्थ नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या लढाईची जवाबदारी नितीन गडकरींवर सोपवावी.

त्यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना कोरोना विरोधातील या लढाईत मोकळीक दिली नसल्याचे सांगितले आहे. पण ते विनम्र असल्याने त्यांनी आतापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले असून नितीन गडकरींच्या मदतीने ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, असेही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.