बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला जोर


मुंबई : देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय कधी घेतला जाणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जात आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला विद्यार्थी अभ्यास करत आहेत.

पण सीबीएसई (CBSE) आणि राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप काहीच स्पष्टता न देण्यात आल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

तर बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्यामुळे प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन, बारावीच्या परीक्षांसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.

कोरोनामुळे दहावी परीक्षा रद्द झाली मग बारावी परीक्षेचे काय? दहावी प्रमाणे बारावी परीक्षांबाबत सारखाच निर्णय का नाही? विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस बारावीचा अभ्यास करायचा? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून केले जात आहेत. याव्यतिरिक्त ट्विटरवर #cancel12boardexam2021 ही मोहीमसुद्धा मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. कारण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑफलाइन परीक्षा शक्य नसल्यामुळे इतर पर्यायांची तातडीने चाचपणी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील जवळपास दीड लाख बारावीचे विद्यार्थ्यी आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका सर्व्हेत 78 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर 11 टक्के विद्यार्थ्यांनी इतर पर्याय अवलंबून परीक्षा घ्यावी, असे म्हटले आहे. तर इतर 11 टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा द्यायला तयार असल्याचे स्पष्ट होत आहे.