काल दिवसभरात 3,38,439 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृत्युंची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 382,315 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3780 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 3,38,439 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात यापूर्वी एक मे रोजी 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधितांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात काल दिवसभरात 51 हजार 880 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिलासादायक म्हणजे काल राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे. राज्यात काल 891 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.