आंध्र प्रदेश सरकारने केली प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार देण्याची घोषणा


हैदराबाद : प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने केली आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात प्लाझ्मा दान करण्यासाठी जवळपास ३७००० लोक पात्र आहेत. अशात कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील, यासाठी राज्य सरकारने प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिर सुरू केले आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशानुसार, या प्लाझ्मा दानसंदर्भातील कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये देऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

राज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर विशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असून सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लॅड बँकांशी संपर्क साधण्यात येत आहे. पुढे भास्कर यांनी सांगितले की, कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरमधून कॉल केला जाईल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगितले जाईल. तसेच, त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यासाठी प्रवृत्त करेल.

दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील कोरोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.

मंगळवारी आंध्र प्रदेशात २०,०३४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ११,८४,०२८ च्यावर गेली आहे. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण १०,१६,१४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे आतापर्यंत ८,२८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १,५९,५९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.