वडोदऱ्यानंतर आता दक्षिण दिल्लीतील कोरोनाग्रस्त कुटुंबियांना मोफत जेवण देत आहेत पठाण बंधू


विविध क्षेत्रातील मान्यवरांना गेल्या लॉकडाऊनमध्ये पुढे येऊन मदत करताना आपण सर्वांनी पाहिले. त्या गोष्टीला क्रिकेटपटूही अपवाद ठरले नाहीत. त्यातच अनेकांसाठी इरफान व युसूप ही पठाण बंधूंची जोडी खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना भरभरून मदत केल्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रीय झाली आहे. ही जोडी वडोदरा पाठोपाठ आता दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबियांना मोफत जेवण पुरवण्याचे काम करत आहे. त्यांनी त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हेल्पलाईन नंबर शेअर केला आहे.

समाजाप्रती असलेली जबाबदारी गरीबीतून वर आलेल्या पठाण कुटुंबियांनी योग्य रितीने पार पाडली आहे. पठाण बंधूंनी गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सना PPE किट्स व मास्कचे देखील वाटप केले होते.


आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच या दोघांनी वडिलांच्या नावाने सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोनाबाधितांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच या दोघांनी त्यापुढे आणखी एक पाऊल टाकताना क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्सच्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोनाबाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.