माले मधल्या या महिलेने एकचवेळी दिला ९ बाळांना जन्म

अनेक महिलांना जुळी, तिळी होतात हे नवलाचे नाही. काही महिलांनी एकचवेळी चार किंवा पाच बाळांना सुद्धा जन्म दिला आहे आणि त्याच्या बातम्या झाल्या आहेत. माले मधील एका २५ वर्षीय महिलेने मात्र एकाचा वेळी ९ बाळांना जन्म देऊन विक्रम केला आहे. माले मधील या महिलेने मोरोक्को मध्ये या बाळांना जन्म दिल्याचे मालेच्या आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र मोरोक्को आरोग्य मंत्रालयाने याला अजून तरी दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम आफ्रिकेतल्या माले या देशातील हलीम सिजे ही महिला गरोदर होती तेव्हा वेळोवेळी तिची सोनोग्राफी केली जात होती. तेव्हा तिच्या गर्भात ७ बाळे असल्याचे दिसत होते. एकावेळी सात बाळे ही सुद्धा नवलाची बाब असल्याने माले सरकारने तिला ३० मार्च रोजी देखभालीसाठी मोरोक्को येथे पाठविले होते. तेथेही सोनोग्राफी मध्ये तिच्या पोटात सात बाळे दिसत होती. प्रत्यक्षात जेव्हा सी सेक्शनने तिची डिलीव्हरी केली गेली तेव्हा नऊ बाळे जन्माला आली. विशेष म्हणजे आई आणि सर्व बाळांची प्रकृती उत्तम आहे.

नऊ बाळे एकचवेळी जन्माला येण्याची ही बातमी वेगाने जगभर पसरली असून या नवजात बालकांत ५ मुलगे आणि चार मुली आहेत.  हलीम लवकरच बाळांना घेऊन मायदेशी परतेल असे समजते.