सिरमचा २४५७ कोटी गुंतवून ब्रिटन मध्ये लस व्यवसाय विस्तार

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने व्यवसाय विस्तार करण्यासाठी ब्रिटन मध्ये २४ कोटी पौंड म्हणजे २४४५ कोटी रुपयाची गुंतवणूक केली असून त्यामुळे ब्रिटन मधील ६५०० लोकांना रोजगार मिळणार आहे. ब्रिटन मध्ये कंपनी नवीन सेल्स ऑफिस सुरु करत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने भारत आणि ब्रिटन यांच्यात १ अब्ज पौंड गुंतवणुकीची ट्रेड प्रमोशन पार्टनरशिप झाल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सिरमचे सीईओ अदर पूनावाला हे सध्या ब्रिटन मध्येच आहेत. त्यांना धमक्या मिळत असल्याने त्यांनी भारत सोडून काही काळासाठी ब्रिटनला प्रयाण केल्याचे सांगितले जात आहे.

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट सह भारतातील सुमारे २० कंपन्या ब्रिटन मध्ये आरोग्य सेवा, बायोटेक, सॉफ्टवेअर क्षेत्रात महत्वाची गुंतवणूक करत असल्याची घोषणाही केली गेली आहे. सिरमने तर करोना लसीची पहिल्या फेरीतील परीक्षणे ब्रिटन मध्ये सुरु केल्याचे सांगितले जात आहे. सिरमची ब्रिटन मधील गुंतवणूक क्लिनिकल ट्रायल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, लस उत्पादन यासाठी आहे. आरोग्य क्षेत्रातील अन्य एक भारतीय कंपनी जिन कॉर्प पुढील पाच वर्षात ब्रिटन मध्ये ५.९ कोटी पौंड गुंतवणूक करणार असल्याचे समजते.