वाईनच्या या खास बाटलीचा लिलाव, प्राथमिक किंमत ७ कोटी

लंडन येथे एका खास वाईन बाटलीचा लिलाव प्रसिद्ध क्रिस्टी ऑक्शन तर्फे केला जाणार असून या बाटलीची बेसिक प्राईज म्हणजे लिलाव बोलीची सुरवातीची किंमत १० लाख डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपये ठरविली गेली आहे. मंगळवारी हा लिलाव सुरु झाला असून ही वाईन वर्षापेक्षा अधिक काळ अंतराळात स्पेस स्टेशन वर राहून परत पृथ्वीवर आलेली आहे.

अंतराळात शेती करता येईल का याची शक्यता तपासून पाहण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. त्या अंतर्गत नोव्हेंबर २०१९ मध्ये फ्रेंच वाईन्सच्या १२ बाटल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविल्या गेल्या होत्या त्यातील ही एक बाटली आहे. ‘ द पेट्रस २०००’ असे तिचे नाव आहे. या वाईनचा अंतराळात जाण्यापूर्वीच स्वाद तज्ञांनी घेतला होता आणि आता अंतराळात १ वर्षापेक्षा अधिक काळ राहून परत पृथ्वीवर आलेल्या या बाटलीतील वाईनचा स्वाद किती बदलला आहे हे तपासले गेले तेव्हा स्वादात किंचित फरक जाणवत असल्याचे वाईन टेस्टरने सांगितले आहे