फायझरने करोना लस विक्रीतून तीन महिन्यात मिळविला ९० कोटी डॉलर्स नफा

जगातील प्रसिद्ध औषध निर्माती कंपनी फायझरने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ३.५ अब्ज डॉलर्सची कमाई केली असल्याचे जाहीर केले आहे. ही कमाई कंपनीच्या एकूण महसुलाच्या एक चतुर्थांश इतकी आहे. गतवर्षी करोना काळात कंपनीने रेकॉर्ड वेळेत लस निर्मिती केली होती. अन्य औषध निर्माण कंपन्यांनी करोना लसीतून फायदा न मिळविण्याचा निर्णय घेतला असताना फायझरने मात्र या लासीतून फायदा मिळविण्याचा निर्णय घेतला होता.

गतवर्षी अनेक औषध कंपन्यांनी करोना साठी लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु केले मात्र त्यातून नफा मिळविणे हे ध्येय ठेवले नव्हते. फायझरने नफा मिळविण्याचे ध्येय ठेवले होते आणि करोना लसीने कंपनीच्या नफ्यात मोठे योगदान दिल्याचे सांगितले जात आहे. करोना लसीतून कंपनीने नक्की किती नफा मिळविला याचा खुलासा केलेला नाही. मात्र नफ्यात २० टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट केल्याने हा नफा ९० कोटी डॉलर्स इतका असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

जगात सर्वप्रथम फायझरची कोविड लस तयार झाली आणि त्याबद्दल कंपनीची खूप तारीफ सुद्धा झाली. या लसीमुळे जगात अनेकांचे प्राण वाचले. पण मुळात ही लस श्रीमंत देशांनाच मिळाली. गरीब देशांना ही लस देणार असे कंपनीने म्हटले होते पण त्याची अंमलबजावणी झाली वा नाही हे कळू शकलेले नाही. एप्रिल मध्यापर्यंत जगातील श्रीमंत देशांनी फायझरच्या कोविड लसीचे ७० कोटी डोस पैकी ८७ टक्के डोस खरेदी केले होते. गरीब देशांना ०.०२ टक्के डोस मिळाले असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.

कंपनीने आत्ता पर्यंत ९१ देशांना ४३ कोटी लस डोस दिल्याचेही मंगळवारी जाहीर केले आहे.