देशात प्रथमच प्राणीसंग्रहालयातील आठ सिंहाना करोना

भारतात प्रथमच प्राण्यांना सुद्धा करोना झाल्याची घटना घडली आहे. हैद्राबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्क मधील ८ सिंहाना एकच वेळी करोना झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. २४ एप्रिल रोजी झु मधील कर्मचाऱ्यांना सिंहामध्ये करोनाची लक्षणे जाणवली. त्यांची भूक कमी झाली होती. त्यांच्या नाकातून पाणी गळत होते आणि खोकला सर्दी झाल्यासारखे वाटत होते. या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब ही माहिती झु प्रशासनाला दिली. तेव्हा या सिहांची करोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सर्व सिहांची आरटी पीसीआर पद्धतीने टेस्ट केली गेली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून स्वॅब घेतला गेला. तपासणीत या सर्व सिहांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. या झु मध्ये एकूण १२ आशियाई सिंह असून त्यातील आठ जणांना करोना झाला आहे. यात चार नर आणि चार माद्या आहेत.

या प्राण्याच्या स्वॅबची तपासणी केल्यावर त्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यात सापडलेला करोनाचा स्ट्रेन कुठला आहे हे समजेल तसेच या प्राण्यांना करोनाचा संसर्ग कसा झाला याचाही शोध घेतला जाणार आहे. करोना लॉकडाऊन मुळे हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे.

एप्रिल २०२० मध्ये अमेरिकेच्या न्युयॉर्क येथील ब्रोक्स झु मध्ये ८ वाघ सिंहाना करोनाची लागण झाली होती तसेच हॉंगकॉंग मध्ये कुत्री, मांजरांना करोना बाधा झाल्याचे दिसून आले होते.