काल दिवसभरात 3,20,289 लोक कोरोनामुक्त होऊन परतले घरी


नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. तर कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 357,229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 3449 रुग्णांचा जीव गमावला आहे. दरम्यान, 3,20,289 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी रविवारी देशात 368,060 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी केवळ 40 टक्के रुग्णसंख्येची नोंद दरदिवशी भारतात होत आहे.

तर दूसरीकडे देशभरात 3 मेपर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 17 लाख 08 हजार 390 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण 29 कोटी 33 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी देशात 16.63 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 19 टक्क्यांहून अधिक आहे.

दूसरीकडे महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात काल 48 हजार 621 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 59, 500 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात सध्या 6 लाख 56 हजार 870 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत राज्यात एकूण 40,41,158 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.7% एवढे झाले आहे. दरम्यान काल 567 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,78,64,426 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,71,022 (17.12 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,08,491 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,593 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

तर मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत काल दिवसभरात 2 हजार 662 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 5746 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 89 टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 111 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.