दक्षिण भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंतेत भर; १५ पटींनी वाढला मृत्यूचा धोका


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता दक्षिण भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंतेत भर पडली आहे. या व्हायरसच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या नव्या स्ट्रेनला N44OK असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. या स्ट्रेनची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचे सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितले. या स्ट्रेनमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण कोरोनाबाधित होतो.

N44OK हा कोरोनाचा नवा स्ट्रेन B.1.617 आणि B.1.618 स्ट्रेनपेक्षा अधिक घातक असल्याचे दिसून आले आहे. हा स्ट्रेन रुग्णांना लगेच आपल्या विळख्यात घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ३ ते ४ दिवसातच रुग्णांची स्थिती खालावत असल्यामुळे चिंता वाढली आहे. हा स्ट्रेन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही भारी पडत आहे.

N44OK हा कोरोनाचा नवा स्ट्रेन दक्षिण भारतात आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात B.1, B.1.1.7, B.1.351,B.1.617 आणि B.1.36 (N44OK) या स्ट्रेनमुळे बाधित रुग्ण आढळत आहेत.

B.1.1.7 या स्ट्रेनची देशातील सर्वाधिक नागरिकांना बाधा झाली आहे. पण आता समोर आलेला स्ट्रेन सर्वाधिक घातक असल्याचे अभ्यासातून समोर आल्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणे गरजेचे आहे.