सदाभाऊ खोतांना सांगली जिल्हा कोरोनाबाधितांची स्मशानभूमी होण्याची भीती


सांगली : राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल माहीत असताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे म्हणत माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तर कोरोनाबाधितांची स्मशानभूमी सांगली जिल्हा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीतील कोरोना परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी पत्र लिहून जिल्ह्यातील काय वस्तुस्थिती आहे, याची माहिती देणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

राज्यातील जनतेला या सरकारने देवाच्या भरवशावर सोडून दिले आहे. सर्वच ठिकाणी सरकार ठोकशाही पद्धतीने आणि दादागिरी करून काम करत आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे सरकार विसरून गेलेले आहे. तुम्ही गुंड, ठग म्हणून सत्तेवर बसलेले नाही तर जनतेचे सेवक म्हणून बसला आहात याची जाणीव ठेवा, असेही खोत म्हणाले.

सांगली जिल्हा कोरोनाबाधितांची स्मशानभूमी होतो का काय अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना बाबतीत परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मी कळवणार आहे. एकीकडे रेमडीसिवीर मिळत नाही, तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र यामध्ये सरकारची आणि जनतेची देखील दिशाभूल करत आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन पूर्ण संपल्यामुळे काही हॉस्पिटलमधील रुग्ण माझ्या डोळ्यासमोर दगावले आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे, पण व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. पण काही मंत्री जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा असल्याचे सांगत आहेत. मग दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी कशाने पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल देखील खोत यांनी विचारला.

त्यामुळे आता राज्यातील मंत्र्यांनी हवेत गोळीबार न करता, हवेत न बोलता जमिनीवर येऊन रुग्णालयांना भेटी दिल्यास सत्य परिस्थिती काय आहे, हे कळेल असेही खोत म्हणाले. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारा, हे आम्ही सहा महिन्यापूर्वीच सांगून देखील प्रशासनाने याबाबतीत काही पाऊले उचलले नाहीत. आज प्रत्येक तालुक्यात पालकमंत्री बैठका घेत आहेत. नुसत्या बैठका घेण्याऐवजी प्रत्येक तालुक्यात रेमडीसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळवून द्या, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना केले आहे.