कंगना राणावतची टिवटिवाट ट्विटरने केली बंद


अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत असते. पण आता तिच्या एका ट्विटमुळे ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले आहे. कंगनाने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. आता त्यावर ट्विटरने कारवाई करत तिचे अकाऊंट सस्पेंड केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंगना देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली भूमिका मांडली होती. कंगनाचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आहेत. सुरुवातीला क्वीन कंगना या नावाने सुरू झालेले तिचे अकाऊंटनंतर कंगना राणावत या नावाने व्हेरिफाईड झाले होते.

तिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरूवात केली. तिने आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरतीही टीका केली होती. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचारानंतर तिने आंदोलकांना खलिस्तानवादी म्हटले होते. त्यानंतर आपला मोर्चा तिने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे वळवला. कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका सुरू केली.