महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी माफी मागावी – सचिन सावंत


मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण केंद्र सरकारकडून चुकीची धोरणे व नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्य सरकारवर फोडून नामानिराळे राहण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्राला भरपूर लसींचा साठा दिला पण अपव्यय जास्त केला जात आहे, हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना लसींचा अपव्यय 6% नसून, तो केवळ 0.22% आहे. जावडेकरांचा हा खोटारडेपणा मोदी सरकारच्याच माहितीने उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत भाजप व प्रकाश जावडेकरांचा समाचार घेताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनावर मात करण्यासाठी धैर्याने काम करत असून महाराष्ट्राने लसीकरणात देशासमोर आदर्श घालून दिला आहे. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लसींचा कमीतकमी अपव्यय ठेवला. परंतु, दु:ख याचे वाटते की राजकारणासाठी जावडेकरांसारखे भाजप नेते महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत.

लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत, लोकांमध्ये लस घेण्यासाठी दांडगा उत्साह आहे, लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. पण, अपुऱ्या लशींमुळे त्यांना हात हलवत परत जावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे कालपर्यंत महाराष्ट्रात फक्त 23547 लसी शिल्लक होत्या. नवीन लसींच्या पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, नरेंद्र मोदी जर वेळेवर लसी देत नसतील तर महाराष्ट्राने जनतेची सेवा कशी करावी? नियोजन कसे करावे? त्याचबरोबर उठसुठ खोटे आरोप करुन महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात वेळेवर लशीं देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, असा सल्ला देखील सावंत यांनी जावडेकरांना दिला आहे.

अशोका विद्यापीठाच्या “सेंटर फॉर डाटा अँड अॅनालिसिस” या विभागाच्या “कोविड वॅक्सिनेशन प्रोग्राम- नॉट अ रोझी पिक्चर” या अहवालात दर्शविल्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या व लोकसंख्या या निकषावर लसी वाटपात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच 45 वर्षांवरील लोकसंख्येचा विचार करता यातही लस वाटपात महाराष्ट्र 14 व्या स्थानी आहे. एवढ्या कमी प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे. परंतु महाराष्ट्राला केंद्राने सर्वाधिक लसी दिल्याचा अपप्रचार राज्यातील भाजपा नेत्यांकडून होत आहे.

महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात असून लसींचा पुरेसा साठा असल्याचे जावडेकर व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन धादांत खोटे सांगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षाचे सरकार आहे या मानसिकतेतून महाराष्ट्राशी सुरु असलेली सापत्नभावाची वागणूक सोडा आणि 13 कोटी जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही सावंत म्हणाले.