पश्चिम बंगालचा अवमान केल्याप्रकरणी कंगना राणावतविरोधात तक्रार दाखल


आपल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत ही कायम चर्चेत असते. पण तिच्या याच वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत देखील येते. तिने सध्या केलेले ट्विट हे अपमानास्पद असून, पश्चिम बंगाल आणि तेथील नागरिकांची अवहेलना करणारे असल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचा मुद्दा अधोरेखित करत या तिच्याविरोधात कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ई मेलच्या माध्यमातून थेट कोलकात्याचे पोलीस आयुक्त सुमेन मित्रा यांच्याकडेच यासंदर्भातील तक्रार अॅड. सुमीत चौधरी यांनी केली. यामध्ये त्यांनी कंगनाच्या ट्विटच्या लिंकही पुरावा म्हणून जोडल्याचे सांगितले जात आहे.

राजकारणाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, यामध्ये आपल्याला प्रवेशही करायचा नाही. पण ज्या प्रकारे कंगनाने हे अवहेलनाजनक ट्विट केले आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्वच नागरिकांच्या विशेषत: ज्यांनी मतदान केले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मतदान करणे हा फक्त संविधानिक हक्क नसून हे त्यांचे कर्तव्यही असल्याचे म्हणत कंगनाच्या ट्विटच्या माध्यमातून हिंदूंची संख्या अधिक नसल्यामुळे त्यांना बंगालमध्ये धोका असल्याचे भासवण्यात आले असून हे पूर्णत: चुकीचे असल्याचे ठाम मत चौधरी यांनी मांडले आहे. कंगनाचे ट्विट पाहून माझ्याच मनात भीती, द्वेषाची भावना जागृत झाली, तशीच इतरांच्याही मनात निर्माण झाली असेल, असे म्हणत त्यांनी कंगनावर आक्षेप घेतला.

ममता बॅनर्जी यांची बांगलादेशी आणि रोहिंग्या हेच ताकद आहेत. येथे हिंदूंची संख्या जास्त नाही, हे स्पष्ट होत आहे आणि माहितीनुसार बंगाली मुस्लिम हे सर्वात गरीब आहेत. चांगले आहे, देशात आणखी एक काश्मीर आकारास येत असल्याचे ट्विट तिने केले होते. तिने आणखी एका ट्विटच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळाले आहे, याबाबत ट्विट करत देशातील सत्ताधारी पक्षाची प्रशंसा केली होती.

कंगनाच्या याच ट्विटमुळे तिच्या मतप्रदर्शनामुळं अनेक मार्गांनी पश्चिम बंगाल आणि तेथील नागरिकांचा अवमान झाल्याचा मुद्दा अधोरेखित करत तक्रारकर्त्या वकिलांनी तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलीस यंत्रणेकडे केली आहे. असे न केल्यास कंगना समाजात अशाच प्रकारे द्वेषाची भावना परसवेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.