आणखी एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भारताच्या मदतीसाठी हात


नवी दिल्ली – भारतात हाहाकार माजवलेल्या कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघात असलेला जेसन बेहरेनडॉर्फने युनिसेफला देणगी दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

बेहरेनडॉर्फ या हंगामात चेन्नईच्या संघात होता, पण एकही सामना त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचा जोश हेजलवूडच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता. बायो बबलमध्ये थकवा जाणवत असल्याचे सांगून हेजलवूडने आयपीएलमधून माघार घेतली. या हंगामासाठी झालेल्या लिलावात बेहरेनडॉर्फवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.

बायो बबलला कोरोनाने भेदल्यानंतर बीसीसीआयने आता आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केले आहे. आयपीएलमधील काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काही मैदान कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बेहरेनडॉर्फ आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, भारताचे इतर क्रिकेटपटूंप्रमाणे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. हा एक सुंदर देश आहे, लोक नेहमीच स्वागत करतात आणि भारतात क्रिकेट खेळणे हा खूप चांगला अनुभव आहे. पण, जे येथे घडत आहे ते खरोखर भयावह आणि त्रासदायक आहे. माझे विचार या विषाणूमुळे पीडित असलेल्यांपासून कधीही दूर नाहीत.

तुम्ही काय सहन करत आहात, याची मी कल्पनाही करू शकत नाही. युनिसेफ प्रकल्पात या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा होती. ज्यांनी भारताचे आदरातिथ्य अनुभवले आहे, अशा सर्वांना मी प्रोत्साहित करतो. मला माहित आहे, की भारतीय लोकांच्या प्रेम आणि मैत्रीच्या समोर ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु मला खात्री आहे की या गोष्टीमुळे काही फरक पडेल.

दरम्यान पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय कोलकाता नाइट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बदलला आणि त्याऐवजी कमिन्स युनिसेफ ऑस्ट्रेलियाला हा निधी देणार आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची मदत या निधीद्वारे केली जाईल. कमिन्सच्या आवाहनानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनेही भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.