बिल गेट्स आणि मलिंडा घेणार घटस्फोट

मायक्रोसोफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती असा परिचय असलेले बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी २७ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी संयुक्त रित्या या संदर्भात ट्विटरवर दिलेल्या निवेदनानुसार त्यांना या पुढे पती पत्नी म्हणून एकत्र राहणे शक्य नसल्याचे आणि त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवर बिल म्हणतात, दीर्घ चर्चा आणि वैवाहिक नातेसंबंध यांचा विचार करून आम्ही वैवाहिक जीवन संपविण्याचे ठरविले आहे. गेल्या २७ वर्षात आम्ही आमच्या तीन मुलांना व्यवस्थित सांभाळून त्यांना मोठे केले आहे. आम्ही दोघांनी मिळून एका फौंडेशनची स्थापना केली आहे आणि त्यातून जगभरातील लोकांना आरोग्यपूर्ण आणि चांगले जीवन मिळावे यासाठी मदतीचा हात दिला जातो. आम्ही घटस्फोट घेत असलो तरी या फौंडेशनचे काम एकत्र करणार आहे.

पती पत्नीचे नाते संपवून नवीन जीवनाची सुरवात करताना बिल यांनी त्यांच्या कुटुंबाचे खासगीपण अबाधित राहावे अशी विनंती लोकांना केली आहे. बिल आणि मेलिंडा यांची ओळख १९८७ मध्ये झाली होती. न्युयॉर्क एक्स्पो ट्रेड मेळ्यात बिल यांनी मेलिंडा यांना कार पार्किंग मध्ये डेटिंग साठी विचारले होते तेव्हा मेलिंडा यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र बिल यांनी चिकाटीने मेलिंडा यांचा पाठपुरावा केल्यावर अखेर १९९३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली आणि १९९४ च्या नववर्षदिनी लग्न केले होते.