प्रशांत किशोर पडद्यामागून हलविणार सूत्रे?

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालचे विधानसभा निवडणूक निकाल आल्याबरोबर रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचे म्हणजे या कामातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता अंदरकी बात समोर आली आहे. त्यानुसार प्रशांत किशोर यांची टीम निवडणूक राजकीय रणनीती आखण्याचे काम सुरूच ठेवणार असून प्रशांत त्यांना पडद्यामागून सल्ले देणार आहेत असे समजते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांत भाजप दोन आकडी संख्या गाठू शकणार नाही असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता तेथे भाजपने ७८ वर मजल मारली आणि दुसरे म्हणजे ममता नंदीग्राम मधून पराभूत झाल्या. म्हणजे प्रशांत किशोर यांचे दावे पार उलटे पडले. त्यामुळे टीकेची झोड उठण्याअगोदरच प्रशांत किशोर यांनी एका खासगी वाहिनीवर मुलाखत देताना यापुढे कुठल्याच राजकीय पक्षासाठी रणनीती तयार करणार नाही असे सांगितले होते.

पण प्रत्यक्षात मात्र प्रशांत किशोर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या साठी काम करत आहेत पण ते पडद्यामागून. पंजाब मध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. २०१७ मध्येही प्रशांत किशोर यांनी पंजाबसाठी अमरिंदर यांना रणनीती आखून दिली होती आणि ती यशस्वी ठरली होती. मात्र त्यावेळी पक्षातील अनेक जेष्ठ आणि जुने कॉंग्रेस नेते प्रशांत यांच्यावर नाराज होते. ती नाराजी आता परत भोगावी लागू नये यासाठी प्रशांत किशोर यांनी संन्यास घेतल्याचे जाहीर केले आहे. त्याची टीम अमरिंदर यांच्या साठी रणनीती ठरविणार आहे. म्हणजेच प्रशांत यांच्या सल्ल्यानेच ही रणनीती ठरविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.