फेसबुकवर पुन्हा एकदा सक्रिय होणार डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक अकौंटवरील बंदी मागे घेतली जाण्याची दाट शक्यता असून या संदर्भात बुधवारी महत्वाची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. जानेवारीच्या सुरवातीला कॅपिटल सिटी या अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भडकाऊ प्रतिक्रियामुळे ट्रम्प यांचे फेसबुक अकौंट सस्पेंड केले गेले होते. आता हे अकौंट रीस्टोअर केले गेले तर चार महिन्यांनंतर ट्रम्प पुन्हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर दिसू शकणार आहेत.

सोमवारी फेसबुक ओव्हरसाईट बोर्डाने ट्रम्प यांच्या अकौंटबाबत बुधवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. फेसबुकने अकौंट बंद करण्याचा निर्णय बदलावा यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आणला जात असल्याचेही सांगितले जात आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांनी सोशल मिडिया कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले असून जॉर्जिया राज्यात यासंदर्भात वेगळा कायदा लवकरच लागू केला जात आहे.

फेसबुकवर ट्रम्प यांचे खाते बंद केल्यावर त्यांची सून लारा हिच्या अकौंटवर ट्रम्प यांनी ज्या मुलाखती दिल्या होत्या त्याही फेसबुकने काढून टाकल्या होत्या. त्यात २० जानेवारीला राष्ट्रपती पद सोडल्यावर ट्रम्प यांचा पहिला ऑन कॅमेरा इंटरव्ह्यू होता. फेसबुकच्या ओव्हरसाईट बोर्डची स्थापना गतवर्षी झाली असून त्यात २० सदस्य आहेत. त्यातील पाच अमेरिकन आहेत. या सर्व सदस्यांना फेसबुक पगार देते असेही समजते.