योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, दिली चार दिवसाची मुदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखी एका धमकीची भर पडली आहे.यावेळी पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉटस अप नंबरवर योगी यांना जीवे मारण्याची धमकी २७ एप्रिल रोजी रात्री देण्यात आली आहे. त्यात आजपासून पाचव्या दिवशी आदित्यनाथ यांना ठार केले जाईल, चार दिवसात काय करायचे ते करून घ्या असे बजावले गेले आहे.

या संदेशामुळे पोलीस सावध झाले असून ज्या नंबरवरून मेसेज आला तो नंबर ट्रेस करण्याचे काम सुरु झाले आहे. नंबर ट्रेस झाला असला तरी धमकी देणाऱ्या संशयिताची ओळख पटू शकलेली नाही असे समजते. पोलिसांनी सर्व्हिलान्सची मदत घेतली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध लखनौ सुशांत गोल सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे समजते.