अदर पूनावाला धमकी प्रकरण; माझ्याकडे आणि पक्षाकडे आहे याची माहिती – आशिष शेलार


मुंबई – आपल्याला धमकावले जात असल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण कोणाचेही नाव अदर पूनावाला यांनी घेतले नसून टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्र्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांचे धमकीचे फोन येत असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त करत ज्यांचा हात आहे, त्यांनी खबरदार राहावे असा इशारा मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

आताच्या काळातच पूनावाला यांना सुरक्षा का मागाविशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे दिशादर्शन जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. त्यांना सुरक्षा पुरवत केंद्र सरकारने आपले काम चोख केल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज आम्हाला कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. तर लोकांची सेवा करण्याचे धोरण भाजपने आखले असल्याचेही ते म्हणाले.

ज्यांच्यापर्यंत धागेदोरे या प्रकरणात जातील, त्या पक्षाला उघडे करण्याचे काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे. याची माहिती माझ्याकडे आणि पक्षाकडे आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. मात्र ज्यांचा हात आहे, त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.