आता टेक महिन्द्रा बनवणार ‘कोरोना’वर औषध


नवी दिल्ली – संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीवरील औषध आयटी क्षेत्रातील आघाडीची टेक महिंद्रा आणि रीगेन बायो सायन्स यांनी एकत्र येत शोधून काढले आहे. कोरोना व्हायरसवर गुणकारी ठरणाऱ्या एका रेणूचा म्हणजेच औषधाचा शोध मार्कर्स लॅब टेकने रीगेन बायो सायन्ससोबत टेक महिन्द्राने लावला आहे. महिंद्राची मार्कर्स लॅब टेक ही संशोधन करणारी कंपनी आहे. या मॉलिक्यूलच्या पेटंटसाठी टेक महिन्द्राचे जागतिक प्रमुख असणाऱ्या निखिल मल्होत्रा यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर याची चाचणी करण्यात येणार आहे.

यावर टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स संशोधन करत आहेत. कोरोना विषाणूचे संगणकीय विश्लेषण मार्कर्स लॅबने सुरू केले आहे. त्याआधारे, टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एफडीएने मान्यता दिलेल्या ८००० औषधांपैकी १० औषधांच्या मॉलिक्यूलच्या निवड केली आहे. १० औषधांच्या मॉलिक्यूलपैकी ३ औषधांची निवड केली आहे. त्यानंतर एका थ्रीडी फुफ्फुसावर या औषधांची चाचणी करण्यात आली. तीनपैकी एक औषध परिणामकारक असल्याचे मार्कर्स लॅबने सांगितले आहे. टेक महिंद्राने त्या औषधावर संगणकीय आणि रेजीन बायो सायन्सने वैद्यकीय विश्लेषण केले आहे. मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी वेळेत औषधे शोधता येतील.

प्राण्यांवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर अभ्यास करण्याची देखील आवश्यकता असणार आहे. पण आम्हाला विश्वास आहे की, या तंत्रामुळे औषधांच्या शोधासाठी कमी वेळ लागेल. आम्ही त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी अधिक अभ्यास करीत आहोत. जगभरात बऱ्याच औषधांवर चाचण्या सुरू आहेत. प्राणघातक अशा कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी लोक फक्त लसीवर अवलंबून असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.