आयपीएलच्या समालोचकाने पंतप्रधानांना सुनावले खडेबोल


नवी दिल्ली – सध्या कोरोनाने भारतात थैमान घातले असल्यामुळे अनेक विदेशी क्रिकेटपटू आपल्या मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे तीन क्रिकेटपटू लीगच्या मध्यातच आपल्या मायदेशी देशात परतले आहेत. त्याचबरोबर आयपीएलशी संबंधित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल, असे ऑस्ट्रेलियन सरकारनेही सांगितले होते. या सर्व प्रकरणामुळे मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या आयपीएलमधील एका ऑस्ट्रेलियन समालोचकाने थेट त्यांच्या पंतप्रधानांनाच प्रश्न विचारला आहे.

भारतातून येणारी विमाने ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मेपर्यंत रद्द केल्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू आणि समालोचकांच्या परतीचा मार्ग बंद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी या निर्णयावरून ट्वीटद्वारे पंतप्रधानांना खडे बोल सुनावले आहेत.


स्लेटर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, सरकारने जर ऑस्ट्रेलियन लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली, तर ते आम्हाला घरी येऊ देतील. ही एक लाजिरवाणी गोष्ट असून पंतप्रधान तुमच्या हाताला रक्त लागले आहे, तुमची आमच्याशी असे वागण्याची हिंमत कशी झाली? क्वारंटाइन सिस्टिमविषयी आपण काय बोलाल? आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी मी सरकारकडून घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.