जामनगर रिफायनरीत ऑक्सिजन उत्पादनावर स्वतः मुकेश करताहेत देखरेख

करोना काळात अंबानी परिवार मुंबईला रामराम करून जामनगर येथे स्थलांतरित केल्याच्या बातम्या येत असताना रिलायंस जामनगर रिफायनरी अधिकारी येथे सुरु असलेल्या ऑक्सिजन उत्पादनावर मुकेश अंबानी स्वतः जातीने देखरेख करत असल्याचे सांगत आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनचे उत्पादन आता १ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक होत असून कोविड १९ संकटात तो कोविड प्रभावी राज्यांना मोफत पुरविला जात आहे.

भारताच्या एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ११ टक्के उत्पादन या रिफायनरीत केले जात आहे. या मिशन ऑक्सिजनवर मुकेश लक्ष ठेऊन आहेत. या संदर्भात दुहेरी रणनीती राबविली जात आहे. जामनगर रिफायनरीत प्रोसेस बदल करून जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण केला जात आहे आणि दुसरीकडे त्याचे लोडिंग आणि वाहतूक क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वास्तविक या रिफायनरीत कधीच ऑक्सिजन उत्पादन केले गेले नव्हते मात्र आता करोना संकट लक्षात घेऊन प्रोसेस बदल करून हे उत्पादन शून्यावरून १ हजार मेट्रिक टनावर गेले आहे. यातून रोज १ लाख करोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

एप्रिल पासून आतापर्यंत १५ हजार मे. टन ऑक्सिजन पुरविला गेला आहे तर करोना सुरवात झाल्यापासून ५५ हजार मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सुरवातीला वाहतूक आणि लोडिंग मध्ये अडचणी आल्या पण येथील इंजिनिअर्सनी नायट्रोजन टँकर मध्ये बदल करून ते ऑक्सिजन टँकर म्हणून वापरत आणले तसेच सौदी, जर्मनी, बेल्जियम, नेदरलंड, थायलंड मधून २४ ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करून आणले गेल्याचेही समजते.