काल दिवसभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्णांची कोरोनावर मात


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे भयावह संकट अद्यापही कायम असून याचदरम्यान केंद्र-राज्य सरकारांकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तरी देखील कोरोनाच्या प्रादुर्भावाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशभरात ३,९२,४८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांतील आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात याच कालावधीत ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार एवढी झाली आहे.

शनिवारी दिल्लीतील एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ कोरोना रुग्ण होते. दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तेथील ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुजरातच्या भडोच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन कर्मचारी आणि १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

तर महाराष्ट्रात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.