राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे ‘मनसे’ अभिनंदन


मुंबई – पश्चिम बंगालच्या जनतेने देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. ममता बॅनर्जीच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर ममता यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींना गुलाबांचा गुच्छ देतानाचा स्वत:चा जुना फोटो पोस्ट करत महाराष्ट्राचा उल्लेख असणाऱ्या काही ओळी लिहीत ममतांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या लक्षणीय यशसाठी ममता बॅनर्जीचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवले.


कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसामावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो, असे राज यांनी म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी, तुम्हाला मिळालेल्या यशासाठी मी तुमचे आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो, असेही म्हटले आहे.